Marathi – Introduction

https://beingdifferentbook.com/introduction/

विभिन्नता (Being Different) – पुस्तक परिचय

लेखक : राजीव मल्होत्रा, मराठी अनुवाद : आर. एम टीम

 

सर्व देशांचे सांस्कृतिक प्रवाह माझ्या घराभोवती शक्य तितक्या मोकळेपणाने वाहावेत अशी माझी इच्छा आहे. परंतु त्यामुळे मी स्वत: वाहवत जाणे मला मान्य नाही.

– महात्मा गांधी

भारत पाश्चात्य देशांपेक्षा कसा वेगळा आहे हा या पुस्तकाचा विषय आहे. पाश्चात्त्य विचारसरणी सर्वव्यापक आहे तसेच भारतीय धर्मपरंपरा आणि यहुदी, ख्रिश्चन धर्मपरंपरा एकच शिकवण देतात अशा महत्वाच्या समजुतींना या पुस्तकातून आव्हान देण्यात आले आहे. सत्य एकमेव आहे परंतु ते जाणण्याचे मार्ग अनेक आहेत असे वेदांमध्ये सांगितले गेले आहे. परंतु या मार्गांतील फरक महत्वाचे आहेत. भारतीय धार्मिक परंपरा पूर्णपणे निर्दोष नसल्या तरीही नास्तिकता आणि विज्ञानाबरोबरच इतर विविध धार्मिक श्रद्धांना एकत्र बांधून ठेवत अनेकतत्त्ववादावर आधरित समाजरचना निर्माण करण्यासाठी आवश्यक दृष्टीकोन आणि पद्धती त्या पुरवतात. तसेच आजच्या उदयोन्मुख जगाच्या दृष्टीने अमूल्य ठरणाऱ्या पर्यावरणीय सक्षमता व सर्वांगीण विकास साधण्यासाठी आदर्श उदाहरण समोर ठेवतात. या पुस्तकाद्वारे धार्मिक आणि पाश्चात्त्य सभ्यतांना अधिक माहिती व गंभीरतेने समजून घेता येईल असा विश्वास वाटतो.

हे मुद्दे मांडताना व्यापक व्याख्या, सामान्यीकरण व टोकाच्या विरोधाचा वापर केल्याचा आरोप माझ्यावर केला जाऊ शकतो. मी याविषयी जागरूक आहे की ‘पाश्चात्त्य देश’ विरुद्ध ‘भारत’ किंवा ‘यहुदी-ख्रिश्चन धर्म’ विरुद्ध ‘धार्मिक परंपरा’ असे वर्गीकरण करत असताना, उत्तरआधुनिकतावादान्वये योग्यरीत्या आव्हान दिल्या गेलेल्या ‘पदार्थवादात’ मी अडकू शकतो. मी हेही जाणून आहे की अशा विस्तृत वर्गीकरणात परस्परभिन्न आणि कित्येकदा परस्परविरोधी परंपरा समाविष्ट असू शकतात. अशाप्रकारे या संज्ञा चर्चेसाठी आरंभबिंदू बनून आणि दोन्ही बाजूंतील विरोधाभास कमी करून आपली आकलनशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात. मी या संज्ञांना अमूर्त किंवा अपरिवर्तनशील न मानता, त्यांना कौटुंबिक समानता व मार्गदर्शकांच्या भूमिकेत पाहतो. बहुतेक लोक या संज्ञांना, त्या एकमेकांच्या विरुद्धार्थी असल्या तरीही, विविध आध्यात्मिक व वैश्विक कलांनी युक्त मूळ वस्तूकडेच निर्देश करण्याचे साधन मानतात.

नेमकेपणाने सांगायचे झाल्यास प्राचीन इस्राईलच्या बायबल आधारित परंपरा आणि अभिजात ग्रीक-रोमन परंपरा यांच्या अस्वाभाविक एकत्रीकरणातून उत्पन्न झालेल्या संस्कृती व सभ्यतांना या पुस्तकात ‘पाश्चात्त्य’ असे संबोधले गेले आहे. त्यातही अमेरिकन इतिहास व संस्कृती प्रातिनिधिक असल्याने त्यांवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पाश्चात्त्य देशांची स्वत:ला समजून घेण्याची प्रक्रिया व भारतासंबंधी त्यांचा दृष्टीकोन मुळातून उलगडून दाखवण्याच्या मुख्य हेतूनेच मी युरोपीय इतिहास तपासतो आणि भारतीय धर्मासंबंधी पाश्चात्त्य विचारांस आकार देण्यात जर्मनीच्या भूमिकेकडे विशेष लक्ष देतो.

‘भारत’ या शब्दात आजचा आधुनिक भारत तसेच ज्या सभ्यतेतून तो निर्माण झाला आहे ती सभ्यता असे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत. भारतीय ओळख विविध घटकांमध्ये विभागण्याची सध्याची प्रचलित पद्धत मी अनुसरत नाही, या पद्धतीस याआधीच्या माझ्या पुस्तकात भारत विखंडन असे संबोधले गेले आहे. ही पद्धत न वापरण्यामागची कारणे पुढे सविस्तर येतीलच.

‘यहुदी-ख्रिश्चन’ अशा शब्दसंकराद्वारे दोन परस्परभिन्न आणि अनेकदा विरोधी ठरणाऱ्या धर्मांना एकत्र आणले गेल्याने काही यहुदी आणि ख्रिश्चनांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. या दोन्ही धर्मांतील महत्त्वाचा फरक दाखवताना वरील शब्दसंकर वापरण्याचे मी टाळतो परंतु, या धर्मांमध्ये ऐतिहासिक साक्षात्काराला दिलेले समान अनन्यसाधारण महत्त्व दर्शवण्यासाठी हा शब्दसंकर उपयुक्त आहे. (ऐतिहासिक साक्षात्काराचे हे उदाहरण काहीशा वेगळ्या स्वरूपात ईस्लाममध्येही पाहायला मिळते परंतु, त्याचा विचार या पुस्तकात केलेला नाही.)

भारतात उगम पावलेल्या आणि आज हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख अशा विविध प्रकारे व्यक्त होणाऱ्या आध्यात्मिक परंपरांना, या पुस्तकात ‘धर्म’ असे संबोधण्यात आले आहे. मी हे समजावून सांगितले आहे  की, धर्मातील विविध दृष्टीकोन आणि चालीरीती त्यांच्या मुळाशी असणारी आध्यात्मिक पातळीवरील अभिन्न एकता दृगोच्चर करतात जी त्यांतील मुक्तपणा व परस्पर सौहार्दाला सहाय्यभूत ठरते. धर्माची व्याख्या करणे सोपे नाही आणि या पुस्तकाचा बराचसा भाग धर्माची काही परिमाणे स्पष्ट करण्यासाठी वापरल्या गेला आहे. कित्येक शतकांपासून विकसित होत गेलेल्या वैविध्यपूर्ण जीवनशैली व विचारमतांना धर्माने धारण केले आहे. धर्म या शब्दाचे ‘रिलीजन’, ‘पाथ, ‘लॉ’, ‘एथिक्स’ असे नेहमी केले जाणारे भाषांतर त्याचा नेमका अर्थ स्पष्ट करण्यात कमी पडते. यावरून असे म्हणता येईल की संस्कृतमधील धर्मविषयक तत्वे आणि पूर्वधारणा इंग्रजीमध्ये जशास तशा भाषांतरित करता येत नाहीत.

मी आत्ताच नमूद केल्याप्रमाणे पाश्चात्त्य पायाभूत संकल्पना आणि विचारमते निर्माण होण्यामागे एक नसून दोन स्रोत आहेत: यहुदी-ख्रिश्चनांमध्ये प्रेषित व मसिहांद्वारे अभिव्यक्तीत झालेले ऐतिहासिक साक्षात्कार आणि अॅरीस्टॉटलचे तर्कशास्त्र व अनुभवसिद्ध ज्ञानावर आधारलेली ग्रीक विचारसरणी. यांद्वारे निर्माण झालेल्या ‘पाश्चात्त्य’ सांस्कृतिक जडण-घडणीच्या मुळाशी धार्मिक संस्कृतीप्रमाणे अभिन्न एकता नसून कृत्रिम एकता का आहे, हे मी सविस्तरपणे स्पष्ट करीन. पाश्चात्त्य संस्कृती गतीशील असली तरीही स्वाभाविकरीत्या अस्थिर आहे. यामुळे चिंता व आंतरिक गोंधळासह अशांत, विस्तारवादी व कित्येकदा आक्रमक ऐतिहासिक मोहिमा चालवल्या गेल्याचे दिसून येते. या अस्थिरतेची परिणती इतरांबरोबरच खुद्द पाश्चात्यांवरही विध्वंसक परिणाम होण्यात झाली आहे. याउलट भारतीय सांस्कृतिक जडण-घडण अधिक स्थिर, लवचिक व अगदीच नगण्य विस्तारवादी आहे. तसेच तिला मिळालेल्या धार्मिक आधारामुळे (ताण आणि प्रायोगिकता लक्षात घेऊनही) पाश्चीमात्यांत आढळणारे ऐतिहासिक साक्षात्कारांबद्दलचे परस्परविरोधी दावे तसेच ‘विज्ञान विरुद्ध धर्म’ अशा स्वरूपाचे अनावश्यक संघर्ष टाळता येतात.

हे स्पष्ट होईलच की या दोन्ही परस्परभिन्न विचारमतांचा शोध मी तटस्थ किंवा निरिच्छ भूमिकेने (जे अशक्यच आहे) घेतला नसून उघडपणे धार्मिकदृष्ट्या घेतला आहे. परंतु, यातून नेहमीच उद्भवणाऱ्या आपल्या सुवर्णेतिहासाचे उदात्तीकरण साधणे मला अपेक्षित नाही. धार्मिक दृष्टी अनुसरून मी केवळ विरुद्धावलोकन (पाश्चीमात्यांकडून केल्या जाणाऱ्या पौर्वात्यांच्या सांस्कृतिक अभ्यासाची दिशा बदलणे) करू इच्छितो ज्यात सहसा पाश्चात्त्यांना मिळणारे प्राधान्य असणार नाही. हे विरुद्धावलोकन पाश्चात्य समस्यांचे विशिष्ट पद्धतीने मूल्यांकन करून काही नजरेआडील मुद्दे ठळकपणे दाखवते आणि आज जगाला भेडसावणाऱ्या काही समस्यांचे निराकरण करण्यात धार्मिक संस्कृती कशाप्रकारे मदत करू शकेल हेही दर्शवते.

भारताकडे, केवळ जुन्या आणि नव्याची निव्वळ योयायोग व गैरसोयीने झालेली भेसळ किंवा अस्वाभाविक एकतेपायी बनलेली कृत्रिम रचना या दृष्टीने पाहता येणार नाही. भारत हा काही पाश्चात्त्य जीवनशैलींना लागणाऱ्या चमत्कारिक व आकर्षक वस्तूंचा पुरवठा करणारा देश नाही किंवा जागतिक भांडवलशाहीच्या दृष्टीने एक छोटा भागीदारही नाही. भारताची स्वत:ची अशी एकत्रित सभ्यता आहे जिची गंभीर मतभेद संभाळण्याची क्षमता, विविध संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञानासंबंधीची रचनात्मक संलग्नता आणि मानवतेच्या अनेकविध विचारधारांचे शांततापूर्वक एकत्रीकरण करण्याचे कसब वेळोवेळी सिद्ध झाले आहे. ही विचारमूल्ये देवत्व, ब्रह्मांड आणि मानवतेविषयक संकल्पनेवर आधारित असून पाश्चात्त्य सभ्यतांच्या मूलभूत मान्यतांपेक्षा अगदी वेगळी आहेत. या पुस्तकात अशा संकल्पना व समजुतींचा ऊहापोह करण्यात आला आहे.

यापैकी काही विश्लेषण अत्यंत गंभीर असून त्यामुळे कदाचित पाश्चात्त्य लोक तसेच त्यांच्या संस्कृतीला मान देणाऱ्या भारतीयांमध्ये (यामध्ये मीही येतो) आत्यंतिक रोष उत्पन्न होऊ शकतो. ते या बाबीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील की पाश्चात्त्यसंस्कृतीची आत्म-आलोचनाची पद्धत तिचे कौशल्य आणि उत्कृष्टतेचे प्रमाण आहे. परंतु ही आत्म-आलोचना नेहमीच पाश्चात्त्यश्रेणी व तेथील ज्ञान निर्माण करणाऱ्या संस्थांपुरतीच मर्यादित असल्याने तिच्यातील कित्येक उणिवांबाबत अनभिज्ञ आहे.

धर्म आणि पाश्चात्त्य मान्यतांना समोरासमोर ठेवताना मी दोन टोकाचे विचार टाळू इच्छितो. एका बाजूला धार्मिक ज्ञान व त्याच्या उदाहरणांचे अति उदात्तीकरण जे अहंकारात बद्लू शकते (आणि पाश्चीमात्यांत अहंकारामुळे निर्माण झालेल्या समस्या उद्भवण्यास कारणीभूत ठरू शकते) तसेच बहिष्कृतता व जागतिक स्तरावर संलग्नता साधण्यात अपयशी ठरू शकते. दुसऱ्या बाजूस जर धर्माकडे निव्वळ मूलत: भिन्न असलेल्या संकल्पनांचा निवडक संग्रह म्हणून पाहण्यात आले तर बदल घडवण्यास आवश्यक ठरणाऱ्या बलनिर्मितीत सर्वांना एकत्र धरून ठेवण्याच्या वृत्तीचा अभाव असेल.

या चिंता विचारात घेत, मी धार्मिक आणि यहुदी-ख्रिश्चन परंपरांमधील पुढील चार फरक सविस्तरपणे स्पष्ट करू इच्छितो:

  • आत्मज्ञान विरुद्ध इतिहास केंद्रीकता
  • अभिन्न एकता विरुद्ध कृत्रिम एकता
  • अव्यवस्थेबाबतची आत्यंतिक काळजी विरुद्ध संदिग्धता व गोंधळाबाबत सहजभाव
  • सांस्कृतिक पाचन* विरुद्ध अनुवाद-अयोग्य संस्कृत शब्द

. आत्मज्ञान विरुद्ध इतिहास केंद्रीकता

धार्मिक आणि यहुदी-ख्रिश्चन परंपरांमधील मूलतः फरक हा त्यांच्या ईश्वराला जाणण्याच्या पद्धतींमध्ये आहे. धार्मिक कुळात (हिंदू, बौद्ध, शीख आणि जैनांसह) व्यापक स्तरावर विकसित आत्म-विज्ञान आणि अनुभवात्मक तंत्रांद्वारे ज्यास ‘अध्यात्म विद्या’  म्हटले जाते, ईश्वरत्व व जाणीवेच्या उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचता येते. अध्यात्म विद्या ज्ञान आणि स्वानुभवावर आधारित जाणिवेचे स्वरूप समजून घेण्यासाठी शतकानुशतके एकत्रित केलेल्या तंत्रपद्धतींचे एक मुख्य अंग आहे जी उच्चकोटीच्या साधकांद्वारे आत्मसात केली जाते. ही वर्णने आणि अशा शोधयात्रांवर निघालेल्या व्यक्तींना अत्यंत सन्मानाने पाहिले जाते पण म्हणून त्यांना धर्मगुरू, मसीहा किंवा अंतिम सत्य सांगणारे समजले जात नाही. ते धर्मनियम सांगणारे किंवा पूर्व साक्षात्कारांची उजळणी करणारे नसून त्यांना आलेला अनुभव व परिवर्तनाची शक्ती पुनर्साधनेने इतरांनाही देण्यात मार्गदर्शक भूमिका बजावणारे असतात. त्यांनी जाणलेल्या सत्याचा प्रत्येक व्यक्तीने स्वानुभवातून पुनर्शोध घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आत्म-विज्ञान व अध्यात्म विद्येकरिता मी स्वज्ञान (एम्बॉडीड नोइंग, embodied knowing) हा शब्द चलनात आणला आहे.

याउलट यहुदी-ख्रिश्चन परंपरा संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित भागधेयाबद्दल बोलणाऱ्या प्रेषितांच्या ऐतिहासिक साक्षात्कारांवर अवलंबून आहेत. संपूर्ण मानवजातीचे अध्वर्यू मानल्या गेलेल्या अॅडम आणि ईव्ह यांच्या ‘महापातकापासून’ सुरु झालेल्या मानवी व्यथांचे मूळ ‘अवज्ञा’ किंवा ‘पाप’ यांमध्ये पहिले जाते. प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च पापी समजल्या गेल्याने तिला ईश्वराशी एकरूपता साधता येत नाही (कमीत कमी धार्मिक पद्धतींप्रमाणे तरी नाही). या परंपरांमध्ये आध्यात्मिक ध्येय ‘पापमुक्ती’ असून ती एका विशिष्ट प्रकारच्या प्रेषितांच्या समजुतींवर आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित ईश्वरेच्छा प्रमाण मानल्यानेच साध्य करता येते. त्यामुळे ईश्वराच्या हस्तक्षेपाची ऐतिहासिकदृष्ट्या नोंद ठेवली जाते आणि ते सत्य आक्रमकरीत्या इतरांवर लादत त्याचा प्रसार केला जातो. व्यक्तींनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या एक विशिष्ट ‘नियमावली’ पाळावी या उद्देशानेच अशा ऐतिहासिक नोंदी ठेवल्या जातात. या इतिहासाचे पुरस्कर्ते कितीही चोखंदळ आणि दोषयुक्त असले तरीही इतिहास मात्र सार्वत्रिक समजला जातो. सृष्टीच्या अंतसमयी (कयामतच्या दिवशी) मानव जातीचे सामुहिक नशीब न्यायनिवाड्यामार्फत निर्धारित केले जाते असे या परंपरा सांगतात.

अशाप्रकारे इतिहासाला परिपूर्णता प्रदान केल्याने वैयक्तिक स्तरावरील आध्यात्मिक शोधाधिकारांची सत्ता कमकुवत होते (या परंपरांत साधकांविषयी असणारी संशयित वृत्ती याचाच परिपाक आहे) आणि अंतिम सत्याबाबत हिरीरीने दावे मांडले जातात ज्यांच्याशी अजिबात तडजोड करता येत नाही. याशिवाय ऐतिहासिक साक्षात्कारांसाठी निवडल्या न गेलेल्यांनी ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न न करता, अज्ञानाच्या अंधारात खितपत पडावे असेही मानले जाते. इतिहासातून दृगोच्चर होणाऱ्या ईश्वरीय सत्याचे विशिष्ट व अनेकदा विसंगत दाव्यांवर अवलंबून राहण्याच्या वृतीला मी इतिहास केंद्रीकता (हिस्टरी सेंट्रीझम history-centrism) असे नाव दिले आहे. धार्मिक आणि यहुदी-ख्रिश्चन मार्गांतील भिन्नतेसाठी मी या ऐतिहासिक अवलंबित्वास कारणीभूत समजतो तसेच आत्यंतिक मानसिक, धार्मिक आणि सामाजिक वाद निर्माण होऊ शकण्याच्या दृष्टीने त्यास समस्याही मानतो.

. अभिन्न एकता विरुद्ध कृत्रिम एकता

यहुदी-ख्रिश्चन परंपरांमधील एकतेच्या संकल्पनेपेक्षा धार्मिक परंपरांमधील एकता प्रकर्षाने वेगळी आहे. प्रत्येक धार्मिक विचारधारा या समजुतीवर सुरु होते की अंतिमत: अखिल ब्रह्मांड हेच पूर्णत्व असून त्यात निकं सत्य आणि सापेक्ष अभिव्यक्ती एकमेकांशी घट्ट जोडल्या गेल्या आहेत. याउलट पाश्चात्य विचारमते मात्र एकीकडे यहुदी-ख्रिश्चनांच्या ऐतिहासिक साक्षात्कारांची सत्यता व दुसरीकडे अणूवाद व प्रखर द्वैतवादावर आधारलेले ग्रीक तत्त्वज्ञान तसेच अॅरिस्टॉटलच्या द्वैती तर्कामधील द्वंद्वातून आकारास आली आहेत. प्रथमत: तर साक्षात्कार व तर्क यांत दुभंगल्या गेल्याने (यालाच काहीवेळा यहुदी व युनानी विचारधारेतील भिन्नता असेही संबोधल्या जाते) आणि त्यानंतर ग्रीकमतात मूलत:च असलेल्या तर्क व अनुमान यांच्या पृथक्करणामुळे पाश्चात्यांची एकतेची संकल्पना पुरती त्रासदायक ठरते. धार्मिक परंपरा अभिन्न एकतेची संकल्पना कशी रुजवतात आणि याउलट यहुदी-ख्रिश्चन परंपरेतील कृत्रिम एकता मुळातच अस्थिर व समस्याप्रधान का आहे याचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात केले आहे.

विविध धार्मिक विचारधारांच्या शिकवणुकीत व साधनेत ठळक फरक असले तरीही त्या सर्व एक प्रकारची एकता साधण्याचा प्रयत्न करतात. जरी सामान्य लोकांना हे अनुभवणे अवघड वाटत असले तरी, ही एकता दृगोच्चर करणारी साधने सर्व आध्यात्मिक शिकवणुकींमध्ये अंतर्भूत केली गेली आहेत.  विविध धार्मिक परंपरांना आधारभूत ठरणारी एकतेची जाणीव प्रबळ असल्याने तसेच ती कल्पकतेस पोषक व अभिव्यक्तीस समजून घेण्यात अत्यंत सहज असल्याकारणाने धार्मिक शिकवणुकींमध्ये व तत्त्वज्ञान समजून घेण्याच्या मार्गांमध्ये पुष्कळ भिन्नता आढळली तरीही त्यामुळे भीती किंवा गोंधळ उत्पन्न होत  नाही.

ब्रह्मांड स्वाभाविकरित्या विविध भागांपासून, वेगवेगळ्या तत्त्वांपासून बनलेला ढीग आहे, अशा विपरीत आधारावर पाश्चात्त्य विचारमतांची सुरुवात होते, मग ते धार्मिक असोत वा धर्मनिरपेक्ष. हे अनेकत्व कसे व का उत्पन्न होते याऐवजी या अनेकत्वातून एकता कशी निर्माण होईल या विषयाबाबत चर्चा होते. अशी एकता जन्मजात (मूलभूत) नाही, ती पुनपुन: शोधावी लागते आणि तिचे समर्थनही करावे लागते, परिणामस्वरूप, केले जाणारे विश्लेषण नेहमीच अस्थिर राहते. यहुदी-ख्रिश्चनांच्या श्रद्धांनुसार (काही योग्यतांसह) ईश्वराला, जग आणि माणसांपासून प्रकर्षाने विलग आणि अपरिमितरित्या दूर समजले जाते. या विभाजनातला एक पक्ष दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. अभिजात पाश्चात्त्यतत्त्वज्ञान आणि विज्ञान (पुन्हा, काही योग्यातांसह) या आधारावर सुरु होते की, ब्रह्मांड अणूंनी अथवा पृथक वस्तूंनी बनलेले आहे. अशा विज्ञान आणि धर्मांना, एकता शोधण्याची किंवा तिचा अविष्कार करण्याची गरज भासते. याशिवाय पाश्चात्त्यधर्म आणि विज्ञानाच्या आरंभबिंदू आणि निष्कर्षांमध्ये परस्पर तणाव आणि विरोधाभास आहे ज्यामुळे पाश्चात्त्यसभ्यता अस्वस्थ आणि विसंगत गोष्टींचे तात्पुरते/प्रायोगिक संकलन बनून राहिली आहे. पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणात या फरकाचे सविस्तर विश्लेषण केले गेले आहे.

. अव्यवस्थेबाबत चिंता विरुद्ध जटिलता अस्पष्टतेबाबत सहजता

धार्मिक सभ्यता पाश्चात्त्यांच्या तुलनेत, अनेकता व अस्पष्टतेबाबत सचिंत नसून अधिक सहज आहेत. धर्मात, अव्यवस्थेकडे सर्जनशीलतेचा व गतिशीलतेचा उगम म्हणून पाहण्यात येते. अंतिम सत्य हे पूर्णत: एकत्रित व सुसंगत असल्याने आणि अव्यवस्था त्याच्याशीच संबंधित एक घटना असल्याने ती ब्रह्मांडाच्या मूळ सुसंगतेला बाधक ठरू शकत नाही किंवा तीत व्यत्ययही आणू शकत नाही. विसाव्या शतकातील महान भारतीय योगी आणि तत्त्वज्ञ श्री अरबिंदो यांच्यानुसार, धार्मिक परंपरांमधील एकसंधता एकत्वाच्या भावनेवर आधारित असल्यामुळे तिथे विघटन आणि अव्यवस्थेची भीती न राहता अनेकत्वाला भरपूर वाव आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, प्रकृती अनंत भेद सहजगत्या सांभाळण्यास समर्थ आहे कारण चिरंतनत्वाचे मूळ अविकारित्व नेहमीच अबाधित राहते.

पाश्चात्यांमध्ये अव्यवस्थेला मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरंतर धोक्याच्या स्वरूपात पहिले जाते, जिच्यावर मात करण्यासाठी नियंत्रण किंवा समूळ उच्चाटनाची गरज पडते. यामुळे मानसिकदृष्ट्या सर्वशक्तीमान व नियंता होण्याच्या अहंकारास खतपाणी मिळते व सामाजिकदृष्ट्या भिन्न असलेल्या इतरांवर शासन करण्याची प्रेरणा त्यातून मिळते. कृत्रिम, अनैसर्गिक एकतेवर आधारलेली वैश्विक विचारधारा चिंतांनी पछाडली जाते. त्यामुळे संस्कृती, वंश, लिंग, लैंगिकता आणि अशा अनेक गोष्टींतून निर्माण होणाऱ्या भिन्नतेस हाताळण्यासाठी सक्तीच्या मार्गांचा अवलंब करावा लागतो.

मूलभूत ग्रंथ, महाकाव्ये, आदर्श आणि विचारमूल्यांच्या जोरावर धार्मिक परंपरा व्यवस्था आणि अव्यवस्था यांचे वर्णन एकाच कुटुंबाचे घटक असे करतात आणि या सहकारी प्रतिद्वंद्वाच्या संकल्पनेभोवती विविध गाथा रचतात. दुधरूपी सागर घुसळण्याची समुद्र मंथनाची लोकप्रिय कथा हीच संकल्पना समजावून सांगते असे या पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात दाखवले आहे.

. सांस्कृतिक पाचन* विरुद्ध अनुवाद अयोग्य संस्कृत शब्द

पाश्चात्त्यविद्वान आणि पाश्चात्यीकरण झालेले भारतीय, धार्मिक संकल्पना व दृष्टीकोनांना पाश्चात्य विचारचौकटींत बसवण्यासाठी त्यांचे भाषांतर करून परस्परसंबंध जोडण्यास सरावले आहेत. यामुळे पाश्चात्य ‘यजमान’ संस्कृती धार्मिक तत्वे ग्रहण करून अधिक समृद्ध व नाविन्यपूर्ण बनत आहे. पाचव्या प्रकरणात हा दृष्टीकोन कसा घातक आहे याविषयी ऊहापोह केला आहे. वाघाने केलेल्या शिकारीबाबत असे म्हटले जात नाही की वाघाने शिकार पचवून दोघांचेही ‘भले’ साधले आहे किंवा अधिक चांगला प्राणी तयार करण्यासाठी दोन भिन्न प्राणी एकमेकांमध्ये सामावले गेले आहेत. याउलट वाघाने पचवलेली शिकार प्राय: नष्ट होत जाते आणि अन्न म्हणून त्याच्या शरीराचाच भाग बनते. धर्माचे योग्य प्रतिनिधित्व करण्यास सक्षम नसणाऱ्या पाश्चात्य संकल्पना वापरून धार्मिक परंपरा आणि ज्ञानाशी तडजोड केली जात आहे आणि इतकेच नव्हे तर त्यांना नष्टही करण्यात येत आहेत. (* याच प्रक्रियेला राजीवजींनी सांस्कृतिक पाचन, कल्चरल डायजेशन, Cultural Digestion) असे म्हटले आहे.)

असमान राजकीय सत्ता असणाऱ्या सर्वच आंतरसभ्यतांमध्ये ही समस्या धोकादायक ठरू शकते. परंतु संस्कृतात लिहलेल्या धार्मिक संकल्पना इतर पाश्चात्य भाषांमध्ये अनुवादित करताना ही समस्या विशेष तीव्र ठरते. केवळ संस्कृतच नाही तर इतर भाषाही त्या त्या संस्कृतीचे विशिष्ट आणि निराळे अनुभव, वैशिष्ट्ये व्यक्त करत असतात परंतु भाषेचे मूळ स्वरूप, ध्वनी, प्रकटीकरण यांचे परिणाम त्यांच्या अर्थांपासून वेगळे करणे शक्य नाही.

ज्या पवित्र ध्वनी (मंत्रांनी) संस्कृत भाषा बनली आहे ते प्राचीन काळी भारतातल्या ऋषींनी आत्म विज्ञानाद्वारे शोधून काढले होते. हे ध्वनी अंदाजाने अथवा अपघाताने सुचले नसून त्यामागे आध्यात्मिक साधना होती त्यामुळे या ध्वनींशी संलग्नित वास्तविकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. ध्यानाचे कित्येक प्रकार या ध्वनींवर प्रयोग करून विकसित करण्यात आले, आणि आत्म विज्ञानाच्या उत्क्रांतीद्वारे साधकास अनादि काळाच्या एकत्व चेतनेपाशी पोहोचवण्यात आले. संस्कृत भाषा तिच्या उगम स्थानाकडे नेणारा एक अनुभवात्मक मार्ग उपलब्ध करून देते. ती केवळ संभाषणापुरती मर्यादित नसून स्व-ज्ञान साधण्यासाठीचे साधन आहे. भारत, आग्नेय आशिया व पूर्व आशियातील आध्यात्मिक नेत्यांनी शतकानुशतके भाषा म्हणून उपयोगात आणलेली संस्कृत, विशिष्ट सांस्कृतिक प्रणाली व अनुभव व्यक्त करण्यासाठीचे माध्यम बनली आहे.

या सांस्कृतिक विचारचौकटीसाठी ‘संस्कृती’ ही संज्ञा आहे. ही तत्वज्ञान, कला, वास्तुकला, लोकप्रिय गाणी, शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, शिल्पकला, चित्रकला, साहित्य, तीर्थयात्रा, धार्मिक विधी, गाथा तसेच इतर सर्व अखिल भारतीय सांस्कृतिक लक्षणांचे प्रतीक असलेल्या विद्येचे भांडार आहे. यात प्राकृतिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्याही सर्व शाखा समाविष्ट आहेत उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्र (पशु चिकित्सेसह), वनस्पतीशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, स्थापत्य, आहारशास्त्र, इत्यादि.

यहुदी-ख्रिश्चन श्रद्धांनुसार त्यांच्याही हिब्रू, लॅटिन सारख्या पवित्र भाषा आहेत आणि त्यांच्याबाबतही संस्कृत प्रमाणेच काही दावे करण्यात येत असले तरीही या भाषा धार्मिक सभ्यतांसारखे एकत्व साधू शकल्या नाहीत. या भाषांमधील फरक पाचव्या प्रकरणातून स्पष्ट होईल.

याशिवाय ख्रिस्ती धर्मप्रसार सुरुवातीपासूनच एका पवित्र भाषेतून नव्हे तर स्थानिक भाषांमधून करण्यात आला जसे, सर्वप्रथम येशू ख्रिस्त वापरायचे ती अरमी भाषा, त्यानंतर भूमध्य प्रदेशातील रोजच्या व्यवहाराची ग्रीक भाषा. ‘नव्या करारा’च्या कित्येक भाषांतरांमधून ईश्वरत्वाच्या प्रत्यक्ष अनुभवापेक्षा, ईश्वराविषयीचे संदेश  किंवा शुभसमाचारांची घोषणा करण्यात आलेली आहे. इथे मुख्य भर शब्दांचे अर्थ व त्याद्वारे केल्या जाणाऱ्या इतिहासाच्या उजळणीवर असून ध्वनी, नाद किंवा त्यावर दिल्या जाणाऱ्या आत्मिक प्रतिक्रियेवर नाही. ख्रिस्ती धर्मात मंत्रांसारखी आध्यात्मिक परंपरा नाही (परंतु प्रार्थना आहे) आणि प्रार्थनेचे स्वरूप बाहेरील देवतेजवळ केलेले आर्जव, संभाषण किंवा उपकार मानणे असे आहे. यात शाब्दिक अर्थाला ध्वनी किंवा याचकावर होणाऱ्या अनुभवजन्य परिणामांपेक्षा फार अधिक महत्त्व आहे.

सांस्कृतिक चयापचयाद्वारे पाश्चात्यांकडून धर्माला पचवले जात असल्याने संस्कृतचे अनुवाद-अयोग्य स्वरूप आणि अर्थ यांच्याशी तडजोड केली जात आहे. हे केले जात असताना अत्यंत महत्वाचे भेद व शिकवण नष्ट होत आहे, महत्वाचे प्रायोगिक अनुभवांना प्रतिबंध केला जात आहे आणि धर्माचे सुपीक, फलदायी आणि दूरदृष्टी वागवणारे स्वरूप नष्ट करून त्यास प्राचीन काळात ढकलले जात आहे.

तळटीपा:

संस्कृत भाषेसंदर्भातील अनुवादअयोग्यता

धर्म = religion, ईश्वर = God, आत्मन = soul, देवमुर्ती = idol, शक्ती = Holy Spirit, यज्ञ = sacrifice, शिव = destroyer, माया = illusion, मिथ्या = spurious, मोक्ष = salvation इ. भाषांतर सध्या प्रचलित असले तरी ते सुयोग्य नाही कारण ते मूळ शब्दाचा मथितार्थ किंवा त्यामागील भावना उलगडून दाखवण्यास सक्षम नाहीत.

वेदांतील सूक्ते, उपनिषदांतील शांतीमंत्रे, पातंजल योगसूत्रे, सौंदर्यलहरी, गायत्रीमंत्र यांचे भाषांतर केले तरीही मंत्रांचा प्रभाव उच्चारांमध्ये असल्यामुळे त्यांच्या भाषांतरातून अर्थवजा माहितीपेक्षा अधिक काही मिळण्याची अपेक्षा नाही.