Marathi – Synopsis

https://beingdifferentbook.com/synopsis/

 

विभिन्नता (Being Different) या पुस्तकाचा सारांश

लेखक: राजीव मल्होत्रा, मराठी अनुवाद : आर. एम टीम

एक संघराज्य असण्यापलीकडे, भारत हा स्वत:चे तत्वज्ञान व वैश्विक विचारांधिष्ठित संस्कृती जपणारा देश आहे. सध्या सर्वत्र फोफावलेल्या पाश्चात्य संस्कृतीच्या तुलनेत भारतीय संस्कृती अनेकार्थाने भिन्न आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास आपल्या धर्ममुलक आध्यात्मिक परंपरांचे देता येईल जिच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या परंपरा पाश्चात्य विचारधारेत आढळून येत नाहीत. परंतु दुर्दैवाने जागतिक पार्श्वभूमीवर भारताचे वाढते महत्त्व व त्यायोगे मिळणारी लोकप्रियता साजरी करण्याच्या नादात आपल्या सभ्यतेचा ठेवा पाश्चात्य सार्वभौमिकतेत पचवल्या* जात आहे ज्यामुळे भारतीय संस्कृतीतील वैविध्य आणि सामर्थ्य कमी होत आहे.

‘विभिन्नता’ (Being Different) या पुस्तकातून राजीव मल्होत्रांनी भारताची ‘निरीक्ष्य’ भूमिका बदलून ‘विरुद्धावलोकन’ तत्त्वाद्वारे निरीक्षकाच्या दृष्टीने पाश्चात्त्य विचारांची धर्मचिकित्सा केली आहे व त्यायोगे समोर येणाऱ्या विभिन्नतेच्या मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा घडवली आहे. असे करत असताना दोन्ही पक्षांना स्वत:विषयी तसेच परस्परांविषयी असणाऱ्या व आजतागायत पुरेशी चिकित्सा न केल्या गेलेल्या समजांनाही हे पुस्तक आव्हान देते. पाश्चात्य धर्मतत्त्वांचा मुख्यआधार त्या त्या धर्मात झालेले अद्वितीय ऐतिहासिक साक्षात्कार असून भारतीय धर्माचा मुख्य भर मात्र येथेच शारीरिक कर्मे करत आत्मबोध साधण्यावर आहे हा फरक या पुस्तकात ठळकपणे दाखवण्यात आला आहे. अभिन्न एकता व कृत्रिम एकतेची संकल्पना मांडून भारतीय तत्त्वमीमांसेच्या मुळाशी असलेल्या अभिन्न एकतेचे, कृत्रिम एकतेवर आधारित पाश्चात्य विचार व इतिहासाच्या तुलनेत असलेले वेगळेपण हे पुस्तक विशद करते. पाश्चात्यांना वाटणाऱ्या भिन्नतेच्या चिंतेपोटी त्यांचा ठोस धार्मिक व्यवस्थेचा आग्रह आणि याउलट भारतीय धर्मात सहज सर्जनशील विभिन्नतेच्या योगे येणारी अव्यवस्था यांतील विरोधाभास या पुस्तकात स्पष्ट केला आहे तसेच या ‘अव्यवस्थेस’ नैसर्गिक निर्मिती मानणाऱ्या आपल्या धर्मदत्त परंपरांचा देखील उहापोह केला आहे. भाषांतर करताना केल्या जाणाऱ्या वैचारिक संक्षेपीकरणाच्या सध्या प्रचलित पद्धतीला या पुस्तकातून आक्षेप घेतला गेला आहे तसेच संस्कृतमधील काही ठराविक अनुवाद-अयोग्य शब्द मूळ स्वरूपातच जतन करण्याची गरजही व्यक्त केली गेली आहे. सरतेशेवटी हे पुस्तक पाश्चात्य सार्वभौमिकतेच्या दाव्याचे खंडन करून विविध सभ्यतांवर आधारित वैश्विक दृष्टीकोन निर्माण करण्याची आवश्यकता प्रतिपादित करते.

 

या पुस्तकातून करण्यात आलेली विविध विषयांवरील चर्चा व वाद, ‘पूर्वपक्ष’ या प्राचीन धार्मिक परंपरेला अनुसरून आहे. वाद-विवाद करण्यास उत्सुक व्यक्तीने प्रथमत: विरोधी पक्षाचा दृष्टीकोन व शक्तीस्थळे तपासून घेतल्यानंतरच स्वत:चा पक्ष समोर ठेवावा असे ही परंपरा सांगते. पूर्वपक्षाची परंपरा सर्व दृष्टीकोनांतून अभ्यास करून, संबंधित विषयाचे पूर्ण, सखोल ज्ञान प्राप्त करावे व विरोधी पक्षावर केवळ विजय मिळवण्याची ईर्ष्या न ठेवता त्या पक्षाविषयी यथोचित आदरही बाळगावा यासाठी प्रोत्साहन देते. पूर्वपक्षाची परंपरा निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी असल्याने यातून पुढे आलेले विचार आपल्या मूळ विचारांशी फारकत घेणारे, हानिकारक आणि वादग्रस्त वाटत असले तरीही सर्व पक्षांनी ते स्वीकारावेत अशी अपेक्षा यातून व्यक्त करण्यात आली आहे.

या पुस्तकात धार्मिक व पाश्चात्य परंपरांमधील भेद स्पष्ट करण्यासाठी खालील सहा मुद्यांचा प्रामुख्याने  विचार करण्यात आला आहे:

) विभिन्नतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन:

वैयक्तिक व सांस्कृतिक भिन्नतेबाबत पाश्चिमात्यांची चिंता, त्यांच्या मूळ तत्त्वांत न बसणाऱ्या इतर सर्व बाबींचा गैरवापर करणे, (स्वत:मध्ये) पचवणे*, धर्मांतरे घडवून आणणे, मूळ ओळख पुसून टाकणे अशा कित्येक कृतींमधून दृगोच्चर झाली आहे. याउलट भारतीय धार्मिक परंपरा पूर्णत: निर्दोष नसल्या तरीही वैयक्तिक व सामूहिक भिन्नतेबाबत सहज असल्याचे तसेच विस्तार व नियंत्रणाधिष्ठित नसल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या दिसून आले आहे.

) इतिहास केंद्रिकता विरुद्ध अध्यात्मविज्ञान:

विशिष्ट लोक आणि त्यासंबंधित स्थळांच्या ऐतिहासिकतेत यहुदी-ख्रिश्चन धर्मांची मुळे रुजली आहेत. या धार्मिक परंपरांत दैविकता माणसांत नसून बाहेरील शक्ती असल्याचे व तीच आपल्या एकमेवाद्वितीय साक्षात्कारांनी समाजास मार्गदर्शन करत असल्याचे मानले जाते. याविरुद्ध भारतीय धार्मिक परंपरा ध्यानाच्या तंत्रशुद्ध पद्धती व अध्यात्मविज्ञानावर भर देऊन त्यायोगे उच्च श्रेणीचे स्व-ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.

) अभिन्न एकता विरुद्ध कृत्रिम एकता:

अॅरिस्टॉटलच्या काळापासून पाश्चात्य सभ्यतेने अणुवादास  प्रमाण मानून वस्तुस्थितीचे आणखी विशिष्ट व असंबंधित भागांत विभाजन केले. सर्वशक्तीमान ईश्वर, हे जग तसेच आत्म्यासंबंधी परस्परभिन्न गुणधर्मांवर यहुदी-ख्रिश्चन धर्मीयांची वैश्विक मते आधारलेली आहेत. याबरोबरच ग्रीक तर्क आणि धार्मिक साक्षात्कार यांतही फार मोठे अंतर आहे. या परस्परभिन्न मानल्या गेलेल्या गोष्टी बलपूर्वक एकत्र ठेवाव्या लागत असल्याने त्या विलग होण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणूनच ही बलपूर्वक निर्माण केलेली एकता कृत्रिम ठरते. भारतीय धर्मातील वैश्विक मतांनुसार या संसारातील प्रत्येक वस्तू एकाच पूर्णत्वापासून बनलेली आहे. हिंदूंमध्ये ही मान्यता ‘ब्रह्मन्’ च्या स्वरूपात अभिन्न एकता प्रस्थपित करते तर बौद्धांमध्ये नश्वरता व सहनिर्भरता ही तत्त्वे अशी एकता साधतात. भारतात धर्म आणि विज्ञान यांना भिन्न न मानता त्यांचा विचार एकाच शोधयात्रेचे अभिन्न भाग असा केला गेला आहे. या विचारमतानुसार वस्तुस्थितीचे पृथक्करण न करता तिचा एक पैलू इतर सर्व पैलूंशी निगडीत असून त्यात इतर सर्व पैलूंचे प्रतिबिंबही दिसते अशी विणलेल्या जाळ्याची कल्पना केली आहे.

) अव्यवस्था अनिश्चिततेचे स्वरूप:

पाश्चात्य धर्म, समाज, राजकारण, नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र इत्यादींमध्ये दिसून येणारा नीटनेटकेपणा त्या विचारधारेत अभिप्रेत असलेला व्यवस्थेचा आग्रह दाखवण्याबरोबरच अव्यवस्था, अनिश्चितता व गुंतागुंतीबद्दल त्यांना वाटणारी भीतीही दृगोच्चर करतो. भारतीय मतानुसार अनिश्चिततेला एका सर्जनशील उत्प्रेरकाच्या भूमिकेतून पाहण्यात येते, जे कालानुरूप क्षीणता येणाऱ्या व्यवस्थेस समतोल साधण्यास मदत करते. अशाप्रकारे, अनिश्चिततेला एक वैश्विक घटक मानल्याचा परिणाम तिच्यासंबंधी एक सहजभाव निर्माण होण्यात झाला आहे.

) अनुवादयोग्यता आणि संस्कृत:

पाश्चात्य भाषांच्या तुलनेत मूलध्वनीवर आधारित वस्तूचा अनुभव देण्यास सक्षम असणारी संस्कृत भाषा आपल्या वैयक्तिक व सांस्कृतिक जडणघडणीसाठी आवश्यक घटक आहे. त्यामुळे पाश्चात्य विचारचौकटींतून होणारे संस्कृत भाषांतर तसेच सांस्कृतिक पाचन* प्रक्रियेतून गेलेली संस्कृत भाषा मूळ स्वरूपाऐवजी संकुचित स्वरूपात व्यक्त होते.

) पाश्चात्य सार्वभौमिकतेस आव्हान:

पाश्चात्य संस्कृतीची धार्मिक अथवा धर्मनिरपेक्ष गौरवगाथा  इतिहासाच्या एकचालकानुवर्तित्वाने एक साचा तयार करून इतर सर्व समाज व राष्ट्रांना त्यात बसवण्याचा प्रयत्न करते. भारतीय धार्मिक दृष्टीकोन, इतिहास तसेच भविष्याकडे साचेबद्ध नजरेतून पाहत नसल्याचे लक्षात घेऊन या पुस्तकाद्वारे पाश्चात्य सार्वभौमिकतेस आव्हान दिले आहे.

भारतीय धर्मपरंपरेत प्रकर्षाने आढळणारी वैचारिक मोकळीक बऱ्याचदा इतर सत्ताकांक्षी सभ्यतांचे आक्रमण होण्यास व त्यायोगे  इथल्या संस्कृतीचा गैरवापर व नुकसान होण्यास कारणीभूत ठरली आहे. जागतिकीकरण, एकीकरण किंवा उत्तर आधुनिकवादान्वये भिन्नतेचे खच्चीकरण अशा विविध प्रक्रियांद्वारे होणाऱ्या सांस्कृतिक ऱ्हासासाठी ‘सांस्कृतिक चयापचया’ची उपमा या पुस्तकात योजली आहे. अशाप्रकारे भारतीय परंपरांच्या पाश्चात्यीकरणाच्या हेतुपुरस्सर प्रयत्नांचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात आले असून त्याद्वारे या पाश्चात्यीकरणामागच्या कारणांची चिकित्सा न करताच त्यांचा स्वीकार करणाऱ्यांना आव्हान दिले आहे.

 

तळटीपा:

* सांस्कृतिक पाचन

वाघाने केलेल्या शिकारीबाबत असे म्हटले जात नाही की वाघाने शिकार पचवून दोघांचेही ‘भले’ साधले आहे किंवा अधिक चांगला प्राणी तयार करण्यासाठी दोन भिन्न प्राणी एकमेकांमध्ये सामावले गेले आहेत. याउलट वाघाने पचवलेली शिकार प्राय: नष्ट होत जाते आणि अन्न म्हणून त्याच्या शरीराचाच भाग बनते. धर्माचे योग्य प्रतिनिधित्व करण्यास सक्षम नसणाऱ्या पाश्चात्य संकल्पना वापरून धार्मिक परंपरा आणि ज्ञानाशी तडजोड केली जात आहे आणि इतकेच नव्हे तर त्यांना नष्टही करण्यात येत आहेत. या प्रक्रियेलाच राजीवजींनी सांस्कृतिक पाचन (कल्चरल डायजेशन, cultural digestion) असे म्हटले आहे.